गोळीबार करीत पंढरपुरात गुन्हेगाराचा राडा

Foto

हवेत गोळीबार करत ग्रा.पं. सदस्याला जिवे मारण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वाळूजजवळील पंढरपूर परिसरात एका गुंडाने भरदुपारी ग्रामपंचायत सदस्याला रस्त्यात गाठून अर्वाच्य शिवीगाळ करीत पिस्तूलमधून गोळी झाडली. हा थरार शनिवारी (दि. २०) पाऊणेतीनच्या सुमारास पंढरपूर येथील नेहा हॉस्पिटलसमोर घडला. या हल्ल्यातून ग्रामपंचायत सदस्य सुदैवाने थोडक्यात बचावले असून कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी भरदिवसा गोळीबारामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीती व घबराटीचे वातावरण पसरले आहे.
तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य जावेद ईस्माईल शेख (रा. पंढरपूर विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोर) यांनी दिलेल्या माहिती नुसार, ते मित्र जलील शेख यांच्यासोबत शनिवारी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास मुलाला आणण्यासाठी स्कुटीवरून जात असताना नेहा हॉस्पिटलजवळ थांबले. नातेवाईक फरीद शेख, चुलतभाऊ अमान शेख व चुलते सत्तार शेख मियाँ यांच्याशी बोलत असताना समोर उभा
असलेला जुबेर पठाण उर्फ सुपड्या व इसाक शेख हे त्यांच्याजवळ आले. त्यावरून तुला अक्कल आहे का? लहान मुलांना गाडीत घेऊन फिरतोस असा सवाल केला. त्यावेळी माजेद शेख, जमील शेख, करत विनाकारण वाद उकरून काढत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फरीद शेख व काका शेख सत्तार हे जुबेरला समजावण्याचा प्रयत्न करून जाण्यास सांगत होते. मला पंढरपूरचा डॉन म्हणतात, माझ्या नादाला लागलास तर जिवे मारून टाकेन, अशी धमकी देत पिस्टलने हवेत गोळीबार करून कामगार चौकाच्या दिशेने निघून गेला.
याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोउपनि सलीम शेखसह डीबी पथकाने पाहणी केली. तपास अधिकारी सपोनि अरविंद शिंदे यांनी पंचनामा केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions